जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

पुणे : सात बारा उताऱ्यात आपले नाव सामावून घ्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मात्र यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेल्या इतरांनी समयसूचकता दाखवत त्याला आत्मदहन करण्यापासून रोखले.

मिळालेल्या माहितीनुसार, फुलगाव, ता़ हवेली येथील शेतकरी नागेंद्र गोपाळ वंजारी वय ४७, यांची वडिलोपार्जित जमीन आहे़. सुमारे ७० वर्षांपूर्वी त्यांनी ती विकत घेतली होती़. त्यापैकी काही जमीन त्यांच्या चुलत्यांनी सुमारे ४० वर्षांपूर्वी परस्पर विकली असा त्यांचा आरोप आहे़. ही जमीन परत मिळवून देऊन त्याच्या सातबारावर आपले नाव सामावून घ्यावे, अशी त्यांची मागणी होती़. यासाठी शुक्रवारी सायंकाळी ते जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या मजल्यावर आले होते़. मात्र अधिकाऱ्यांनी तुम्ही न्यायालयात जाऊन यावर तोडगा काढावा, असे सांगण्यात आले होते़.

परंतु, कुणीच आपले म्हणणे ऐकून घेत नाही, असे वाटून त्यांनी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायक सतीश जाधव यांच्या कार्यालयात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेत काडेपेटीने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़. पण, हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या लोकांच्या लक्षात येताच त्यांनी समयसूचकता दाखवत त्यांच्याकडील काडेपटी हिसकावून घेतली़. त्यानंतर शेतकऱ्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले़. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी नागेंद्र गोपाळ वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.