प्रदूषणाचा भस्मासुर ; प्रत्येक मुंबईकर पितोय रोज तीन सिगरेट

मुंबई : दिवसागणिक कमी होत चालेले जंगल, वाहनाची वाढती संख्या, कारखान्यांन मधून निघणारा धूर या सर्वांमुळे मुंबईचा श्वास अक्षरशः कोंडत चालला आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकावर या प्रदूषणाचा दुष्परिणाम होतोय. उदाहरणच द्यायचे झाले तर सिगरेट पिल्याने शरीराला जी हानी होते तितकीच हानी या प्रदूषणामुळे होत आहे.

शहरात फिरताना तीन सिगारेट ओढल्याइतकी प्रदूषित हवा तुमच्या प्रत्येक श्वासातून फुफ्फुसात जात आहे. महामुंबईतील माझगाव, नेरूळ आणि अंधेरीपाठोपाठ वांद्रे-कुर्ला संकुलात सर्वाधिक प्रदूषण असल्याचे ‘मुंबई सफर’च्या पाहणीत आढळून आले.

देशभरातील प्रमुख महानगरांमधील प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीमार्फत सेन्सर बसवण्यात आले आहेत. त्या सेन्सरमधून प्रत्येक मिनिटाची प्रदूषणाची पातळी नोंदवली जाते.

त्याअंतर्गत मुंबई आणि नवी मुंबईतील हवेत वर्षभरात सरासरी ५८ एकक पीएम २.५ एवढ्या प्रमाणात सूक्ष्म धूलिकण आढळतात. एका सिगारेटमध्ये २२ पीएम २.५ प्रकारचे धूलिकण असतात. त्यानुसार मुंबईतील हवेतून रोज सुमारे तीन सिगारेटचा धूर प्रत्येक नागरिकाच्या फुप्फुसात जात आहे. ४० एककापेक्षा अधिक प्रमाणात धूलिकण असल्यास ते मानवी आरोग्याला घातक मानले जाते.

माझगाव महामुंबईतील सर्वांत प्रदूषित ठिकाण आहे. माझगावाला वर्षभरात सरासरी ७७ एकक सूक्ष्म धूलिकणांची नोंद झाली आहे. म्हणजे साडेतीन सिगारेटचा धूर या भागातील नागरिकांच्या फुप्फुसात पोहोचत आहे.