नवाजने मागितली माफी: वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याचा निर्णय

मुंबई: काही दिवसांपूर्वीच अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं चरित्रात्मक पुस्तक ‘अॅन ऑर्डीनरी लाइफ’ प्रकाशित करण्यात आलं आणि आता त्यावरून निर्माण झालेल्या वादांनंतर नवाजने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवाजने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भातील माहिती दिली.

नवाजने ट्विटमध्ये लिहिलं की, ‘माझ्या चरित्रात्मक पुस्तकामुळे ज्यांच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, त्या सर्वांची मी माफी मागतो. मला या गोष्टीचा पश्चाताप असून मी हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.’

नवाजच्या या पुस्तकात त्याने आयुष्यातील बऱ्याच गोष्टी स्पष्टपणे मांडल्या आहेत. पूर्वाश्रमीची प्रेयसी सुनीता राजवार, अभिनेत्री आणि सहकलाकार निहारिका सिंगसोबतचं अफेअर यांविषयी त्याने लिहिलं होतं. या दोन्ही अभिनेत्रींनी यावर आक्षेप घेत नवाजवर सडेतोड टीकादेखील केली होती. त्यामुळे चरित्राच्या अनावरणापासूनच पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

उत्तम अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये बस्तान बसवलेल्या नवाजचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यानं मॉडेल, अभिनेत्री निहारिक सिंह हिच्यासोबतच्या अफेअरविषयी लिहिलं आहे. निहारिकासोबत माझे शरीरसंबंध आले होते, असंही त्यानं पुस्तकात म्हटलं आहे.

त्यावरून प्रचंड गदारोळ सुरू आहे. निहारिका सिंहनं नवाजचे सर्व दावे फेटाळत त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. स्वस्तातल्या प्रसिद्धीसाठी नवाज एका महिलेची बदनामी करत आहे, असा आरोप तिनं केला. तर, दिल्लीतील एका वकील गौतम गुलाटी यांनी नवाजविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडं धाव घेतली होती.