देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योजकांनी हातभार लावावा: उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू

मुंबई: देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योजकांनी हातभार लावून मोठ्या प्रमाणात रोजगार निमिर्ती करावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.

ते आज हॉटेल ट्रायडंट येथे आयोजित ‘एकॉनॉमिक ॲवार्ड फॉर कार्पोरेट एक्सलन्स-2017’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

श्री. नायडू म्हणाले, प्रधानमंत्री मोदी यांनी देशाच्या विकासासाठी उद्योग धंद्याच्या वाढीस प्रोत्साहन दिले आहे. शेती, उद्योग, फळप्रक्रिया उद्योग यांना चालना दिली आहे. देशाच्या विकासासाठी उद्योजकांचे योगदान फार मोठे आहे. त्यांना राज्यकर्त्यांनी सन्मान द्यायला हवा.

श्री. जेटली म्हणाले, औद्योगीक धोरण आणि उद्योजकांच्या विकासासाठी प्रधानमंत्र्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात उद्योग वाढावेत, तेथील जनतेला रोजगार मिळावा, यासाठी ते प्रयत्नशील असतात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी उद्योजकांनी अधिक गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा आलेख उंचावत आहे. विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. सध्या राज्यात अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. येत्या काळात आणखी काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरु होणार आहेत. महाराष्ट्रात उद्योगांना आवश्यक असणाऱ्या सुविधा येथे उपलब्ध आहेत. देशामध्ये महाराष्ट्र आर्थिक गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडीवर आहे.

प्रारंभी टाईम्स वृत्त समुहाचे विनीत जैन यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पॅनेल डिस्कशन या कार्यक्रमात केंद्रीय वित्तमंत्री जेटली, रेल्वेमंत्री गोयल, मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्योजकांनी उद्योग वाढीबाबत गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासंदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर उपराष्ट्रपती श्री. नायडू यांच्या हस्ते उद्योजक आनंद महिंद्रा यांना कार्पोरेट सिटीझन, प्रेम वत्स-ग्लोबल इंडियन ॲाफ दी इयर, आर.सी. भार्गव- कंपनी आँफ दी इयर, वाय. सी. देवेश्र्वर – लाईफ टाईम अचीव्हमेंट ॲवार्ड, मुकेश अंबानी- बिझनेस लीडर, अरूण जेटली- बिझनेस रिकॉर्नर ॲण्ड पॅालीसी चेंज एजंट यांना इकॅानॅामीक टाईम्स ॲवार्ड देऊन सन्मानीत करण्यात आले.