बौद्ध धर्म उन्नत जीवन शैलीचा प्रभावी मार्ग- महिंद्रा राजपक्षे

औरंगाबाद: मैत्री आणि संयमाची शिकवणूक देणारा बौद्ध धर्म हा भारत देशाची जगाला महत्त्वपूर्ण देण असून उन्नत जीवन शैलीचा बौद्ध धर्म हा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांनी केले.

जाबींदा इस्टेट येथे धम्मयान एज्युकेशनल ॲन्ड चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हल -2017 येथे प्रमुख अतिथी म्हणून श्री. राजपक्षे बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अमर साबळे, आमदार संजय शिरसाट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

श्री.राजपक्षे म्हणाले की, जागतिक स्तरावर सौहार्दाचे वातावरण टिकविण्यासाठी आणि शांततापूर्ण मानवी जीवनासाठी बौद्ध धर्म सर्वार्थाने उपयुक्त असून तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली शिकवण ही सार्वकालिक आहे. जी आजच्या काळासोबतच भविष्यकाळातही मानवजातीला दिशादर्शक ठरणारी आहे. श्रीलंकेमध्ये विविध धर्माचे नागरिक एकोप्याने राहत असून मौर्य काळापासून सम्राट अशोकांनी केलेल्या धर्मप्रसारामुळे बौद्ध धर्माची तत्वे श्रीलंकेने स्विकारलेली आहेत. श्रीलंकेच्या सामाजिक, राजकीय वाटचालीमध्ये बौद्ध धर्माच्या तत्वांचा प्रभाव महत्वपूर्ण आहे. श्रीलंकेसाठी भारताची ओळख हा गौतम बुद्धांचा देश अशी असून बौद्ध तत्वांचे मूळ ग्रंथ संकलन असलेले त्रिपीटक हे श्रीलंकेने जतन केलेले आहे. अशा पद्धतीने भारत -श्रीलंका संबंधांना सांस्कृतिक, धार्मिक आणि ऐतिहासिक ऋणानुबंधाची पार्श्वभूमी आहे. या आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टीव्हलमुळे भारताचे इतर बुद्धिस्ट देशांसोबतचे नातेसंबंध वृद्धिंगत होण्यास निश्चितच चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

श्री.आठवले म्हणाले की, न्याय, समता, बंधुत्व यांची शिकवण देणारा बौद्ध धर्म जागतिक शांततेसाठी महत्त्वाचा आहे. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कल्याणकारक विविध उपक्रम राबविले जात आहेत. याअंतर्गत आता नवबौद्धांच्या जात प्रमाणपत्रावर पूर्वीच्या जातीचा उल्लेख हा शब्दांऐवजी क्रमांकाच्या रुपाने करण्याची सुधारणा करण्यात येणार असून त्यानंतरही धर्मांतरित बौद्धांच्या सवलती पूर्ववत राहतील.

श्री.बडोले म्हणाले, अत्त दीप भव ही शिकवण देणारा गौतम बुद्धांचा धर्म हा स्वआचरणाचा धर्म आहे. याचा अंगीकार प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात केला तर निश्चितच एक समृद्ध जीवनशैली आपण स्विकारु शकतो. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जनसामान्यांना उपयुक्त योजना देण्याचा सक्रिय प्रयत्न असून शिष्यवृत्ती, जातपडताळणी, सामाजिक न्याय विभागाअंतर्गतची महामंडळांचे भाग भांडवल या प्रक्रिया अधिक सुलभ, सुकर करण्याच्या दृष्टीने त्यात बदल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पदोन्नतीतील आरक्षण याबाबतही राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.रावल म्हणाले की, या आंतरराष्ट्रीय बौद्ध महोत्सवासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या असून या महोत्सवाचे प्रमुख महिंद्रा राजपक्षे यांना मुंबईला निमंत्रित केले आहे. औरंगाबाद हे जागतिक पर्यटनस्थळ असून बौद्ध धर्मांच्या महत्त्वपूर्ण स्थळांमध्ये अजिंठा, वेरुळचा समावेश होतो. जागतिक पर्यटकांना महाराष्ट्राशी जोडून ठेवणारा हा महत्वाचा वारसा आहे, हे लक्षात घेऊन राज्य सरकारने बुद्धिस्ट टुरिस्ट सर्कीट ही संकल्पना प्रस्तावित केली आहे. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या पर्यटन पर्वातही बौद्ध स्थळे आणि बौद्ध तत्वज्ञान यांना विशेष स्थान देण्यात आले होते.

यावेळी श्री.बागडे, श्रीमती मुंडे, श्री.खोतकर, श्री.साबळे यांची समायोचित भाषणे झाली. प्रास्ताविक भिक्कू धम्मज्योती थेरो यांनी केले. यावेळी पहिल्या बुद्धिस्ट फेस्टीव्हल स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारतातून तसेच भारताबाहेरील विविध भागातून उपस्थित भिक्कू संघाने यावेळी धम्मदेसना दिली.