नागपुरातील सिमेंट रोडच्या धिमीगती बांधकामाने नागरिक वैतागले

नागपूर : शहरात ठिकठिकाणी सिमेंट रोड बांधले जात असले तरी त्याचे बांधकाम अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे नागरिक वैतागले आहेत.अपूर्ण सिमेंट रोड वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत. त्याची वाहतूक पोलीस विभागाने गंभीर दखल घेऊन कंत्राटदारांना नोटीस बजावली आहे व मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

वाहतूक पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. बैठकीत सिमेंट रोड कंत्राटदारांना बोलावण्यात आले होते. कॉटन मार्केट चौक ते आग्याराम देवी मंदिर चौकापर्यंत रोडवर एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. या परिसरात मेट्रोचेही काम केले जात आहे. त्यामुळे येथे दिवसभर वाहतूक कोंडी होते. यावर कंत्राटदार अश्विनी डेव्हलपर्सला उत्तर मागण्यात आले. दरम्यान, वाहतुकीचा दबाव अधिक असलेल्या रोडवर संथ गतीने काम करणाऱ्या कंत्राटदारांना स्पष्टीकरण मागण्यात आले. त्यासोबतच रिंग रोडचे काम करणाऱ्या आरपीएस, वेस्ट हायकोर्ट रोडचे काम करणाऱ्या जेपीईएसआर एंटरप्रायजेस व सेंट्रल बाजार रोडचे काम करणाऱ्या युनिटी इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीला दिरंगाईवर स्पष्टीकरण मागण्यात आले. एवढेच नाही तर, लक्ष्मीनगर ते माटे चौक रोडच्या कामावरही वाहतूक विभाग असमाधानी आहे.

कंत्राटदारांना रोडवर बोर्ड लावून त्यावर स्वत:चे नाव, काम सुरू करण्याची तारीख, काम समाप्त करण्याची तारीख व कामाची रक्कम याची माहिती नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, त्यावर पोलीस विभागाची अधिसूचना चिपकवायला पाहिजे. कामाच्या ठिकाणी वॉर्डन नियुक्त करायला पाहिजे. तसेच, एलईडी स्टीक, ब्लिंकर लावणे आवश्यक आहे. परंतु, या नियमांचे उल्लंघन होत आहे.

महापालिका सिमेंट रोडच्या कामाबाबत उदासीन आहे. सिमेंट रोडच्या गुणवत्तेवर आक्षेप घेतले जात असताना मनपाच्या एकाही अधिकाऱ्याला त्रुटी आढळून आलेल्या नाहीत. सिमेंट रोडचे पहिल्या टप्प्यात केवळ ५० तर, दुसऱ्या टप्प्यात केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले आहे.

कंत्राटदारांना मानकानुसार वेगात काम पूर्ण करावे लागेल. बैठकीमध्ये कंत्राटदारांना तसे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, मानकांकडे दुर्लक्ष केल्यास कारवाई करण्याची तंबी देण्यात आली असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी दिली.