भाव नसल्याने शेतक-याने टोमॅटोच्या पिकात वाजत-गाजत मेंढ्या सोडल्या

श्रीरामपूर : शेतमालाला भाव नसल्याने शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर टोमॅटोच्या पिकातूनही खर्च न निघाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने हा प्रश्न जनतेसमोर मांडण्यासाठी वाजत-गाजत तसेच फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला.

अखेर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन केल्याचे गवारे यांनी सांगितले. श्रीरामपूरसह नेवासा व राहाता तालुक्यातील शेतकरी ही सहभागी झाले होते. फीत कापून मेंढ्यांना टोमॅटोच्या पिकात सोडण्यात आले. आंदोलनाचे कुठल्याही स्वरूपाचे निवेदन पोलीस व प्रशासनाला दिले नाही. त्यामुळे शहर पोलिसांनी आंदोलन करता येणार नाही, असे आदेश दिले. मात्र आपलेच शेत व आपलेच पिक असल्याने परवानगीची गरजच काय? असा उलट सवाल गवारे यांनी यावेळी केला. शेतकरी आणि त्यांची पत्नी दोघेही उच्च शिक्षित आहेत.

आंदोलनस्थळी अनेक शेतक-यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. २०० ते ३०० शेतकरी यावेळी उपस्थित होते. श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकरी नितीन बाबासाहेब गवारे यांची तीन एकर जमीन आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविण्याकरिता त्यांना भाजीपाल्याची पिके घ्यावी लागतात. नुकतेच कोबी आणि फ्लॉवरच्या घेतलेल्या पिकातून उत्पादन खर्च निघाला नाही. मजुरी व वाहतुकीचा खर्च वजा जाता बाजारात विक्री परवडत नसल्याने जनावरांना पिक खाऊ घातले. टोमॅटो एक ते दीड रूपया किलोने विकला जातो आहे.