स्मृतीस्थळे आणि वारसास्थळांमध्ये काढा फोटो

नवी दिल्ली : अजिंठा लेण्यांमधील गुफा, लेह पॅलेस आणि ताजमहाल वगळता सर्व स्मृतीस्थळे आणि वारसास्थळांमध्ये फोटो काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारतीय पुरातत्व विभागाने १२ जुलैला याबाबत आदेश जारी केला आहे. आतापर्यंत बहुसंख्य स्मृतीस्थळे आणि वारसास्थळांमध्ये फोटो काढण्याला बंदी होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भारतीय पुरातत्व विभागाच्या मुख्यालयाच्या उद्घाटन समारंभांत पर्यटकांना वारसास्थळ आणि स्मारकांचे फोटो काढण्यास मनाई असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. ते म्हणाले होते की आज तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की, एखाद्या शहरातील गल्लीत कोणती गाडी पार्क केली आहे? त्या गाडीचा नंबर काय आहे याची माहिती अंतराळातून फोटो काढून मिळवली जाते. पण आपल्या देशातील स्मारक आणि ऐतिहासिक वास्तूंचे फोटो काढण्यास मनाई असल्याचे बोर्ड वाचावे लागतात. आता वेळ आणि तंत्रज्ञान दोन्ही बदलले असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदी पुढे म्हणाले की, सरदार सरोवर बांधले जात होते तेव्हा लोकांना तेथे येण्याची इच्छा होती. त्यांना सरोवर बघायचे होते मात्र त्याठिकाणी फोटो काढण्यास बंदी होती. तेव्हा मी मुख्यमंत्री होतो मी लोकांना फोटो काढण्यासाठी प्रोत्साहन दिले.

मोदींच्या या भाषणानंतर पुरातत्व खात्याने उल्लेखित आदेश काढला.