अकोल्यातील पहिल्या महिला आमदार डॉ. कुसुमताई कोरपे यांचे वृद्धापकाळाने निधन

अकोला : जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार डॉ. कुसुमताई कोरपे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी असल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज त्यांचे निधन झाले.

डॉ. कुसुमताई कोरपे या महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते दिवंगत सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या पत्नी होत्या. डॉ. कुसुमताई कोरपे यांचा जन्म १९ ऑगस्ट १९२८ रोजी साला असून, त्याकाळातील अकोल्यातील नामवंत कायदेपंडित व राजकीय पुढारी अ‍ॅड. श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांचे वडील होत.

कुसुमताई यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी समाजसेवा करण्यात मग्न असल्याचे त्यामुळे त्याही याच मार्गावर चालू लागल्या. सुरुवातीपासूनच त्यांचा ओढा विद्यार्जनाकडे राहिला. विवाहानंतरही त्यांनी विद्यार्जन ठेऊन एम. ए. ची पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठाने विदर्भातील २० व्या शतकातील ग्रामीण नेतृत्वाचा विकास हा त्यांचा शोध प्रबंध स्वीकारून त्यांना डॉक्टरेट पदवी देण्यात आली.

सण १९५७ ते १९६७ या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक कार्ये केली. मूर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांनतर जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. याचबरोबर, सिलिंग व कुळकायदा या बाबतचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनिय राहिले आहे. महाराष्ट्र को. ऑप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि. मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका म्हणून राहिल्या. शिवाजी शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीवन सदस्या होत्या.