डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे : रामदास आठवले

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून देशभरातल्या अनेक संवेदनशील ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आणि समाजकंटकांना पकडण्यासाठी आंबेडकर यांच्या पुतळ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नाही तर ज्या इतर महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना झाली अशा पुतळ्यासमोरही सीसीटीव्ही कॅमेरे लावले जावेत असे आठवले यांनी म्हटले आहे. रत्नागिरीतल्या खेड मध्ये ते बोलत होते. खेडमध्येही काही दिवसांपूर्वी आंबेडकरांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महापुरुषांच्या पुतळ्यांची गेल्या काही दिवसांमध्ये विटंबना करण्यात आली. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत शरमेची बाब आहे. या पुतळ्यांची विटंबना थांबवायची असेल सीसीटीव्ही कॅमेरे लावावेच लागतील. पुतळ्याची विटंबना झाली की त्या ठिकाणी हिंसाचार वाढतो. समाजकंटकांना हेच हवे असते. हे सगळे टाळायचे असेल तर हा उपाय आहे. आपण लवकरच केंद्राकडे या संदर्भातली मागणी करणार आहोत असेही आठवलेंनी म्हटले आहे.

Facebook Comments