डॉ. आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो : नरेंद्र मोदी

बिजापूर (छत्तीसगड): आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आयुष्यमान भारत’ या आरोग्य योजनेचे उद्घाटन केले. याचवेळी त्यांनी दलित समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी पंतप्रधान होऊ शकलो. छत्तीसगडमधील बिजापूर येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मोदी बोलत होते. बिजापूर मागास राहिले कारण याआधीच्या सरकारने विकास होऊ दिला नाही असा आरोपही नरेंद्र मोदी यांनी केला.

अॅट्रोसिटी कायद्याबाबत सर्वोच्च नाय्यल्याकडून करण्यात आलेल्या निर्णयानंतर केंद्र सरकार दलित विरोधी आहे अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. याचा विरोध करत दलित संघटनांनी २ एप्रिलला भारत बंद पुकारला होता. मात्र, आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत पंतप्रधान मोदी यांनी दलित समजत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ‘१४ एप्रिल हा दिवस देशातील सव्वाशे कोटी जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या निमित्ताने जनतेचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले’, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयुष्यमान भारत योजनेचेही उद्घाटन केले. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांना जशास तसे उत्तरही दिले. ‘एका गरीब आईचा मुलगा. अतिशय मागास समाजातून आलेला आणि तुमच्यापैकीच एक असलेला आज देशाचा पंतप्रधान आहे तो, फक्त बाबासाहेबांमुळेच’, असं मोदी म्हणाले. मोदींनी यावेळी ग्राम स्वराज्य अभियानाचेही उद्घाट केले. दलित, वंचित आणि शोषित महिलांना बळ देण्यासाठी हे अभियान सुरू केल्याचं मोदींनी सांगितलं. हे अभियान ५ मे पर्यंत राबवण्यात येणार आहे.

आयुष्यमान भारत योजनेचा पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. यानुसार प्राथमिक आरोग्य यंत्रणेत मोठे बदल करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक मोठ्या पंचायतींच्या ठिकाणी म्हणजे किमान दीड लाख ठिकाणांवरील आरोग्य उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रूप पालटण्यात येणार आहे.