एअरहोस्टेसवरील प्रेमापोटी प्रवाशाने मुंबई-दिल्ली विमानात ठेवलं धमकी देणारे पत्र !

Jet_Airways

मुंबई: एअरहोस्टेसवर जडलेल्या प्रेमापोटी मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशानेच धमकीचं पत्र ठेवलं होतं. बिरजू किशोर सल्ला असे या तरुणाचे नाव आहे. दर आठवड्यात विमानाने प्रवास करणारा बिरजू सल्ला हा मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलरचा मुलगा आहे.

बोईंग 737-900 विमानाने सोमवारी पहाटे 3 वाजता 115 प्रवाशांसह मुंबईहून दिल्लीसाठी उड्डाण केलं होतं. यानंतर विमानाच्या क्रू मेंबरला एक पत्र सापडलं. “विमान थेट पाकव्याप्त काश्मीरला घेऊन जा. विमानात आता 12 अपहरणकर्ते आहेत. जर विमान दिल्लीत उतरवलं तर त्याच्या कार्गोमध्ये ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट होईल,” अशी धमकी या पत्रात दिली होती.

बिरजू सल्ला याने मुंबई-दिल्ली प्रवास करताना विमानात बॉम्ब असल्याची धमकी देणारे पत्र मागे सोडले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. त्यानंतर त्याने चौकशीदरम्यान आपले जेट एअरवेजच्या एका महिला कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचेही सांगितले होते. अशाप्रकारे धमकी दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा नो फ्लाय लिस्टमध्येही समावेश करण्यात आला.