ड्रायव्हिंग करतांना मोबाइलवर निर्धास्त बोला !

- गुन्हा नाही, केरळ उच्च न्यायलायाचा निर्णय

केरळ : ड्रायव्हिंग करत असताना मोबाइल फोनवर बोलणे गुन्हा नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायलायाने दिला आहे.

न्यायलायाने म्हटले आहे की जोपर्यंत ड्रायव्हिंगमुळे लोकांची सुरक्षा धोक्यात येत नाही तोपर्यंत त्याला बेकायदेशीर म्हणू शकत नाही. कार चालवत असताना मोबाइलचा वापर करणे लोकांसाठी तसंच सार्वजनिक संपत्तीसाठी धोक्याचं आहे असं म्हणू शकत नाही, कारण कोणताही कायदा असं करण्यापासून रोखत नाही असा निष्कर्ष केरळ उच्च न्यायालायने मांडला आहे.

कोच्ची येथील रहिवासी संतोष एम जे या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निष्कर्ष काढला आहे. ए एम शफीक आणि पी सोमरंजन यांच्या खंडपीठाने हा निष्कर्ष मांडला आहे.

संतोष यांच्यावर पोलिसांनी ड्रायव्हिंग करताना फोनवर बोलत असल्याने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी न्यायालयाने कोणताही दंड वसूल न करता प्रकरण निकाली काढलं. तसंच जोपर्यंत लोकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत नाही तोपर्यंत तो गुन्हा मानला जाऊ शकत नाही असं सांगितलं आहे.

1988 मोटर वाहन अधिनियममध्ये नमूद करण्यात आलं आहे की, लोकांच्या सुरक्षेला धोका असेल अशा पद्धतीने कुणी ड्रायव्हिंग करत असेल, मग ती कोणतीही परिस्थिती असो ते दंडनीय आहे. त्यासाठी दंड ठोठावला जाऊ शकतो. मात्र यामध्ये कुठेही मोबाइल फोनच्या वापराबद्दल नमूद करण्यात आलेलं नाही.

ड्रायव्हिंग करताना मोबाइलवर बोलण्याने लक्ष विचलित होऊन अपघात होण्याची शक्यता असते, त्यामुळेच चालकांना असं करण्यापासून रोखण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो.