मुद्रा योजनेच्या कर्जाबाबत बँकांची शहानिशा करणार : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : बँकांनी मुद्रा योजनेतून दिलेल्या कर्जाची शहानिशा करणार असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातून ‘मुद्रा’ योजनेंतर्गत यंदा एक हजार जणांना कर्ज देणार असल्याचेही असल्याचे ते म्हणाले. बँकांनी दिलेले कर्ज आणि जिल्ह्याचा विकास दर यात कुठलेही जुळत नाही जर असे असते तर जिल्ह्याचा विकासदर आणि उद्योगही वाढले असते. परंतु असे दिसत नसल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मुद्रा बँक योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठीची समन्वय समिती व बॅँक अधिकाºयांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, ‘नाबार्ड’चे नंदू नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक जे. बी. करीम, आदी प्रमुख उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना ज्यांना काहीही मिळत नाही, अशांसाठी आखली; परंतु आम्हांला आदेश नाही, अमुक कागद नाहीत, असे सांगून कर्जप्रकरणे नाकारली जातात, असे सांगत ज्या कारणांनी बँका कर्ज नाकारतात, त्या कारणांचा पाढाच पालकमंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांसमोर वाचला. या संदर्भात १५ जूनला बैठक घेण्यात येईल. यामध्ये प्रत्येक बँकेने या विषयाचा १ एप्रिल ते १५ मेपर्यंतचा आढावा सादर करावा, असे आदेशही त्यांनी दिले.

‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजनेतून किमान एक हजार तरुण-तरुणींना उद्योग-व्यवसायांसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. मुद्रा योजनेतून घेतलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या संपूर्ण कर्जाच्या व्याजाची हमी शासन देते. असे असतानाही बँकांना आनुषंगिक तारण व जामिनाची आवश्यकता का भासते, अशी विचारणा त्यांनी केली.