भय्यूजी महाराज अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी

इंदूर : अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्यावर आज इंदूर येथील भमोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. दुपारी 2 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे.यावेळी संतांपासून मंत्री आणि नेत्यांनीही हजेरी लावली. यात महाराष्ट्रातील मंत्री पंकजा मुंडे व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचाही समावेश आहे. मंगळवारी भय्यूजी महाराज यांनी आपल्या निवासस्थानी स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली.

भय्यूजी महाराजांचा मृतदेह फूल-माळांनी सजलेल्या ट्रकमधून नेण्यात आला. इंदूरचे माजी महापौर कृष्ण मुरारी मोघे यांच्यासह जिल्हाधिकारी वरवले, पोलीस उपमहासंचालक हरीनारायणचारी मिश्र आणि महापौर मालिनी गौड यांनीदेखील भय्यूजी महाराजांना आदरांजली दिली. महाराजांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार त्यांची मुलगी कुहू मुखाग्नी देईल.

आज सकाळी ९ वाजेपासून दुपारी १२ वाजेपर्यंत भय्यूजी महाराजांचे पार्थिव त्यांच्या आश्रमात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर विजयनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून भय्यूजी महाराजांच्या अंतिम प्रवासाला सुरूवात झाली. भय्यूजी महाराजांच्या अंतिम दर्शनासाठी देशभरातून अनेक मान्यवर हजेरी लावण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भय्यू महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथील सिल्व्हर स्प्रिंग्स येथील राहात्या घरी रिव्हॉल्वर कानशिलावर ठेवून गोळी झाडली होती. गोळी आरपार गेली होती. त्यांनी लिहिलेली सुसाइड नोटही सापडली आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार कौटुंबिक वादातून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.