सुकाणू समितीच्या आंदोलकांना अटक व सुटका

कोल्हापूर : आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने
त्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, कुठलाही वेळ न घालवता स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आणि त्यानंतर काही तासांनीच त्यांची सुटका केली.

महावीर गार्डन येथून महाराष्ट्र राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या मोर्चास सुरुवात झाली. ‘बैल-एक्क्या’तून सविनय कायदेभंग फॉर्म ठेवून माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने धडक दिली. सरकार बहिरे झाल्याने आम्ही आता त्यांच्यासोबत काहीही बोलणार नाही, त्यांना माणसाची भाषा कळत नसल्याने मालकाशी इमानीइतबारे राहणारा मुका बैलच आमची व्यथा जिल्हाधिकाऱ्यां समोर सादर करेल. त्यामुळे तरी प्रशासनाचे डोळे उघडतात काय पाहू, असे सांगून संपतराव पवार यांनी ‘बैल-एक्का’ जिल्हाधिकारी कार्यालयात घालण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पवार व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यामध्ये खडाजंगी उडाली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.