पुणेरी पगडीला नकार देणे हा तर पुणेकरांचा अपमान – संजय राऊत

पुणे : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर यापुढे पुणेरी पगडीने कोणाचेही स्वागत करू नका, स्वागत करायचेच असेल तर महात्मा फुले यांच्या फुले पगडीने स्वागत करा असा आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणेरी पगडीला नाही म्हणणे हा पुणेकरांचा अपमान आहे. ही पगडी पुण्याची प्रतिष्ठा आहे, पुण्याचे वैभव आहे. आपण सर्वांनी या पगडीचा सन्मान ठेवला पाहिजे, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. पवार प्रत्येक कृती जाणूनबुजून करतात. त्यांच्या या कृतीमागे काय दडले आहे, हे लवकरच बाहेर येईल, असेही ते म्हणाले.
महात्मा फुले प्रतिष्ठान आणि शिवसेना कसबा विभागातर्फे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या तृतीयपंथीय कार्यकर्ते आणि पोलीस अधिकारी यांचा खासदार संजय राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय विद्याथ्र्यांना शालेय साहित्याचे वाटप, वर्तमानपत्रविक्रेत्यांना रेनकोट, महिलांना छत्रीवाटपही यावेळी करण्यात आले. यावेळी खासदार राऊत बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले की, शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारून पुणेकरांचा अपमान केला. पुणेरी पगडी हा पुण्याचा सन्मान आणि वैभव आहे. सर्वांनीच या पगडीचा सन्मान राखला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तृतीयपंथीय व्यक्ती अनेक क्षेत्रांत पुढे गेल्या आहेत. मध्य प्रदेशात विधानसभेत तृतीयपंथीय आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतही त्यांचा प्रतिनिधी असावा. पोलिसांमुळे आपण सुरक्षित वावरतो. त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम हा समाजासमोर आदर्श निर्माण होईल, असेही ते म्हणाले.
शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, सहसंपर्कप्रमुख बाळा कदम, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, प्रशांत बधे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, महिला आघाडीच्या सहसंपर्कप्रमुख निर्मला केंडे, स्वाती कथलकर, अनुपमा मांगडे, शहर समन्वयक राजेश बरगुजे, विभागप्रमुख बाळासाहेब मालुसरे आदी यावेळी उपस्थित होते.