भय्यू महाराज यांच्या ‘अधिकाराच्या’ नोटवरून वाद

इंदूर : स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या सुसाइड नोटवरून नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमधील दुसऱ्या पानावर सेवक विनायकला संपत्ती आणि सर्व आर्थिक व्यवहारांचे अधिकार दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळं महाराजांच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे तर आश्रमातील विश्वस्तांनीही चिंता व्यक्त केली आहे.

दरम्यान, भय्यू महाराजांच्या सुसाइड नोटमधील हस्ताक्षर पोलीस तपासून पाहत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ती सुसाइड नोट भय्यू महाराजांनीच लिहिली आहे. मात्र, त्याबाबत संशय व्यक्त केला जातो आहे. विनायकच्या वाढत्या हस्तक्षेपामुळं भय्यू महाराज नाराज होते, असं त्यांचे नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींचं म्हणणं आहे. भय्यू महाराजांच्या संपत्तीवर त्यांच्या कुटुंबीयांचाच अधिकार आहे. यासंबंधी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तेच घेतील. विनायकचा कोणत्याही प्रकारचा आक्षेप असण्याचा प्रश्नच नाही, असं दीपक साळुंखे (महाराजांचे नातेवाईक) यांनी स्पष्ट केलं.