ओशो रजनीश यांच्या मृत्यूपत्रा बाबत झाला एक धक्कादायक खुलासा !

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखल्या जाणारे आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांचे जीवन अनेक चढ उतारांनी भरलेले होते. तसेच आतापर्यंतच्या सर्वात वादग्रस्त पण तर्कवादी आध्यात्मिक गुरूंमध्ये त्यांची वर्णी लागते. रजनीश ओशो यांच्या मृत्यू ही संशयास्पद रित्या झाल्याने त्यानंतर अनेक उलट सुलट चर्चेला उधान आले होते. पण आता रजनीश ओशो यांच्या बाबतीत एक नवीनच आणि तितकीच धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे अध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या मृत्युपत्राची प्रत जगात कुठेही उपलब्ध नाही, तसेच भारतातील प्रतही बनावट असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) उच्च न्यायालयात दिली. या प्रतीबाबत दिल्ली फॉरेन्सिक लॅबने दिलेला अहवाल या विभागाने न्यायालयात सादर केला.

ओशो रजनीश यांचे खोटे मृत्युपत्र बनवून ट्रस्टने कोट्यवधींची अफरातफर केल्याचा आरोप ओशोंचे निकटवर्तीय योगेश ठक्कर यांनी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केला आहे. याबाबत ठक्कर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतरही चार वर्षे तपास पुढे सरकला नाही. त्यामुळे त्यांनी ही याचिका केली. न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास पुणे ईओडब्ल्यू करत आहे.

मागील सुनावणीत आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. भारतात रजनीश यांच्या मृत्युपत्राची झेरॉक्‍स आहे. मूळ प्रत स्पेनच्या कोर्टात असल्याचे मानले जात होते. येथील झेरॉक्‍स प्रतीवरून रजनीश यांची सही खरी की खोटी आहे याची पडताळणी करणे अशक्‍य आहे, असे अहवालात नमूद केल्याची माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली.

भारतीय तपासयंत्रणा परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने स्पेनच्या कोर्टातून मूळ प्रत मिळविण्यासाठी प्रयत्नशील होत्या; पण त्यांनीही मूळ प्रत नसल्याचे सांगितल्याने पुढील कार्यवाही थांबवली, असे ईओडब्ल्यूने न्यायालयात सांगितले. १ ऑगस्टपर्यंत या तपासाचा प्रगती अहवाल सादर करा, असे सांगत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.