बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पा उद्यापर्यंतची मुदत

नवी दिल्ली : येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी त्यांना बहुमत सिद्ध करावेच लागेल. आणि यासाठी उद्या चार वाजता बहुमत सिद्ध करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना दिला आहे. त्यामुळे आपले बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पांना केवळ २८ तासांचा कालावधी मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे इतक्या कमी वेळात बहुमत सिद्ध करण्यासाठी येडियुरप्पांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

काँग्रेसकडून सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा घटनेच्या विरुद्ध जाऊन होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात जाऊन आम्ही येडियुरप्पांचा शपथविधी रोखू शकत नाही, मात्र, त्यावर सुनावणी घेण्यात येईल असे १७ तारखेला मध्यरात्री सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. तसेच १८ तारखेला येडियुरप्पांना बहुमताचा आकडा दाखवणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. आज सुनावणी दरम्यान येडियुरप्पांचे वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडत आमदारांच्या नावांची यादी सादर केली. मात्र आमदारांचे संख्याबळ त्यांनी नमूद केले नाही.

न्यायमूर्ती ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. राज्यपालांच्या निर्णयावर विस्तृत सुनावणी करायची किंवा उद्याच बहुमत सिद्ध करायचे असे दोन पर्याय असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. त्यावेळी बहुमत सिद्ध करण्यासाठी एक दिवसांचा कालावधी कमी पडेल, आणखी काही दिवसांची मुदत द्या, आम्ही सोमवारी बहुमत सिद्ध करु, असं भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. मात्र कोर्टाने त्यांची मागणी अमान्य केली. सुप्रीम कोर्टाने भाजपला धारेवर धरत १५ दिवसांचा अवधी मागणाऱ्या येडियुरप्पांना चांगलाच दणका दिला. उद्याच दुपारी चार वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करा, असा आदेश सुप्रीम कोर्टाने भाजपला दिला आहे.