दलित खासदारांना संसदेत कमी वेळ दिला जातो; भाजपा खासदाराचा आरोप

नवी दिल्ली : सतत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावर विवादित विधान करून आपल्याच सरकारला विरोधकांच्या टीकेला सामोरे जाण्यास भाग पाडणाऱ्या भाजपाच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी परत एकदा विवादित विधान करून आपल्याच मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. लोकसभेत अनुसुचित जाती, जमाती, मागासवर्ग, आदिवासी समाजाच्या मुद्द्यावर जेव्हा जेव्हा चर्चा होते. तेव्हा तेव्हा आम्हाला बोलण्यास कमी वेळ दिला जातो. त्यामुळे बहुजन समाजाच्या खासदाराला आपले प्रश्न बरोबर मांडता येत नसल्याची तक्रार भाजपा खासदार सावित्रीबाई फुले यांनी केली आहे. बहाराईच येथे नमो बुद्धाय जन सेवा समिती आयोजित धरणे आंदोलनात त्या सहभागी झाल्या असता त्यांनी हा आरोप केला आहे.

बहुजन समाजातील लोकप्रतिनिधी आपले म्हणणे मांडण्यात मागे राहत नाहीत. मला वाटते आरक्षण वाचवण्यासाठी बहुजन समाजातील खासदारांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सावित्रीबाई फुले यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच स्वपक्षावर हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना वाचवण्याचे काम प्रशासकीय अधिकाऱ्यांतर्फे केले जात आहे. हा मुद्दा आपण लोकसभेत मांडणार आहोत. आरक्षण संपवण्याचे षडयंत्र कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करू देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. बहुजन समाजाची मुलगी असल्यामुळे माझे कुणी ऐकत नाही. मला गप्प बसण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. जर आम्ही घाबरलो तर बहुजन समाजाचा अधिकार संपुष्टात येईल. पण अधिकार प्राप्त करण्यासाठी आम्हाला शहीद व्हावे लागले तरी चालेल पण शांत बसणार नाही. बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करण्यासाठी सातत्याने संघर्ष करू, असेही त्या म्हणाल्या.

आपला हक्क मागितल्यामुळे माझ्या प्रतिमेचे दहन केले जात आहे. एक नव्हे तर हजार पुतळे जाळा, मी घाबरणार नाही. मी बहुजन समाजाचा हक्क मागण्यासाठी सदैव तयार आहे आणि कायम तयार असेल. जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तुरूंगात असेल किंवा बाहेर पण बहुजन समाजासाठी लढाई लढतच राहीन, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.