दैनिक भास्करचे समूह संपादक कल्पेश याज्ञिक यांचे निधन

इंदूर :  ‘दैनिक भास्कर’चे समूह संपादक कल्पेश याज्ञिक यांचे गुरुवारी रात्री वयाच्या 55 व्या वषर्षी निधन झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला तेव्हा ते कार्यालयात काम करत होते. त्यांना तत्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. साडेतीन तास डॉक्टरांनी उपचार केले. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

याज्ञिक यांना उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा दुसरा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रात्री २ च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सकाळी ११ वाजता साकेतनगरमधील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघेल.

२१ जून १९६३ रोजी कल्पेश याज्ञिक यांचा जन्म झाला. १९९८ पासून ते दैनिक भास्कर समूहात होते. ५५ वर्षीय याज्ञिक हे प्रखर वक्ते आणि देशातील विख्यात पत्रकार होते. मार्मिक लिखाणासाठी ते ओळखले जात. संवेदनशील मुद्द्यांवर ते निर्भिड व निष्पक्ष लिखाण करायचे. दैनिक भास्करमध्ये दर शनिवारी प्रकाशित होणारा त्यांचा ‘असंभव के विरुद्ध’ हा कॉलम देशभर चर्चेत होता.