किनवट तालुक्यात कापसाचे 33 लाखांचे बोगस बियाणे जप्त

नांदेड : कृषी व पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत साठवून ठेवलेले सुमारे 33 लाख 79 हजार किंमतीच्या बनावट कापसाच्या बियाण्याचे 84 पोते जप्त केले. खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वी हे बियाणे किनवट तालुक्यातील सारखणी येथील एका वेअर हाऊसवर साठवून ठेवण्यात आले होते.

कृषी विभाग व पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने आज वडोली येथे वेअर हाऊसवर टाकलेल्या धाडीत ४०० ग्राम वजनाचे ४ हजार २२४ पाकिटे जप्त करण्यात आली़. त्यामध्ये सम्राट, जयेंद्र, सिकंदर, जादु, जे़डी़, जे़एम़, आदी कंपन्यांच्या बोगस बियाणांचा समावेश होता़. त्याचबरोबर तुळजाई कृषी सेवा केंद्राचे मालक किशोर गुलाबराव कदम यांच्या घरुन बोगस बियाणांचे २४ पाकिटे जप्त करण्यात आली आहेत़.

खरीप हंगामापूर्वी केलेल्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले आहे़ या धाडीत जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, डॉ़विजय भरगंडे, किनवटचे कृषी अधिकारी संजय कायंदे यासह हदगाव, कंधार, नायगावचे कृषी अधिकारी सहभागी होते़.