धक्कदायक !भ्रष्टाचारात पोलीस खाते अव्व्लस्थानी

नागपूर : सामान्य जनतेची सुरक्षा करणारे आणि गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीत निर्माण करणारे पोलीस विभागच लाचखोरीत प्रथमस्थानी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)च्या नागपूर परिक्षेत्रात सुरू असलेल्या वर्षात एकूण ८७ सापळे रचून ११३ लाचखोरांना ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सर्वाधिक १७ आरोपी पोलीस खात्यातील आहे, अशी माहिती एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

एसीबीच्या नागपूर परिक्षेत्रात चालू वर्षात एकूण ८७ सापळ्यांचे आयोजन झाले. त्यात ११३ लाचखोर अडकले. त्यात वर्ग १ चे १२ अधिकारी, वर्ग २ चे १४, वर्ग ३ चे ६८ आणि वर्ग ४ चा एक कर्मचारी हाती लागले. याचबरोबर ११३ लाचखोरात १२ खासगी व्यक्तींचाही समावेश आहे. सापळ्यात अडकलेल्या विविध विभागाच्या शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये १७ आरोपी पोलीस खात्यातील आहेत. त्यात नागपूर शहरातील ४ आणि जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. त्या खालोखाल महसूल विभागाचे १४, पंचायत समितीचे ९, जिल्हा परिषदेचे ७ आणि वन विभागाच्या ६ कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

एसीबी तर्फे ३० आॅक्टोबरपासून भ्रष्टाचार निर्मूलनाच्या उद्देशाने दक्षता जागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३० आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान हे अभियान चालविले जाणार. या अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहे.भ्रष्टाचाराला पूर्णपणे संपवण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी त्याला सहकार्य करावे, असे आवाहनही अधीक्षक पाटील यांनी केले.

अधीक्षक पाटील म्हणाले की, दक्षता सप्ताहात सर्वप्रथम एसीबीचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेतील. त्यांनतर ३१ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता घाट रोड येथील सरदार वल्लभभाई पटेल चौकातून स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीचे समारोप संविधान चौकात होईल. यादरम्यान, शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करून भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका आणि वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्ये सुद्धा सादर करण्यात येणार आहे.

याचबरोबर नागरिकांसाठी सुद्धा व्यंगचित्र व घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, घोषवाक्य २ नोव्हेंबरपर्यंत ७०४०२२२२२१ या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठविता येणार आहे.
त्यानंतर, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नवीन सुभेदार लेआऊटमधील शिवाजी सभागृहात या सप्ताहाचा समारोप केला जाईल. यावेळी भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.