भाषणात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पुण्यात भुजबळांविरोधात तक्रार दाखल

पुणे : आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अडीच वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर पुण्यात तडाखेबाज भाषण केले. मात्र, भाषण देणे भुजबळांना महाग पडले आहे. पुण्यात भाषण करतांना एका वक्तव्यावरून भुजबळांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. अतुल पाटील यांनी सक्तवसूली संचालनालयासह सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे.

पुण्यातील भाषणादरम्यान बोलताना भुजबळ यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप अॅड. अतुल पाटील यांनी केला आहे. भुजबळ या भाषणादरम्यान आर्थिक गुन्हे विभागाने त्यांच्या घरांवर टाकलेल्या छाप्यांचा उल्लेख केला होता. यावेळी त्यानी सांगितले की, छापे कधी पडणार याबाबत त्यांना आधीच माहिती होती. छापे कधी पडणार हे सांगणारा आपला तिकडे असतोच कोणी ना कोणी. त्यावरूनच आपल्याला छाप्यांबद्दल माहिती मिळाली होती, असे वक्तव्य भुजबळांनी पुण्यात केले. याच वक्तव्यावरून अॅड. अतुल पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सक्तवसुली संचालनालय तसेच सीबीआयकडे आणि पुणे पोलिसांच्या विशेष शाखेकडे छगन भुजबळ यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, ईडीच्या छाप्यांबद्दल भुजबळांना माहिती देणारे कोण आहेत याबाबत चौकशी व्हावी असे या तक्रारीत म्हटले आहे.