केरळमध्ये काँग्रेसही जपणार रामनाम

तिरुवनंतपूरम : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा तापण्याची चिन्हे असल्याने भाजपाच्या या मुद्द्यातील हवा काढून घेण्यासाठी डाव्यांपाठोपाठ आता काँग्रेसही प्रभू रामचंद्राला शरण गेली आहे. केरळात दरवर्षी साजरा होणाऱ्या ‘रामायण मास’ निमित्त काँग्रेसने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की माकपही केरळमध्ये ‘रामायण मास’ साजरा करत आहे.

मल्याळम दिनदर्शिकेचा शेवटचा महिना ‘कर्ककिटकम’ केरळमध्ये ‘रामायण महिना’ म्हणून पाळला जातो. १७ जुलैपासून सुरू होत असलेल्या या महिन्यात केरळच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक शाखेने केरळमध्ये ‘रामायण पारायणा’सहित अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

‘रामायणम नम्मूदेथनू, नदिंते ननमयनू’ ( रामायण आमचं आहे, हे समाजाचं चांगूलपण आहे) या बॅनरखाली महिनाभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागानं म्हटलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला १७ जुलै रोजी या कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. सकाळी रामायण पारायणाने सुरुवात होईल. माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यावेळी ‘रामायण आमचं आहे’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. महात्मा गांधींच्या रामराज्याच्या कल्पनेवर आधारीत हे कार्यक्रम असतील, असं काँग्रेसने म्हटले आहे.