पुणे मतदारसंघासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच

पुढील वर्षी होणा-या लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवकाश असला तरी सत्तारूढ भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांनी आपापल्या दृष्टीने मोर्चेबांधणी करायला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कथित एककल्ली वागणुकीचे कारण पुढे करीत सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजपविरुद्ध आघाडी करावी व एकास एक उमेदवार उभा करावा असा विचार राष्ट्रीय पातळीवर चर्चिला जात असताना महाराष्ट्रात मात्र त्याला आतापासूनच सुरूंग लावण्याची तयारी चालली आहे की काय अशी शंका येते. काँग्रेसचे नव अध्यक्ष राहुल गांधी यांनी जुन्या मतभेदांना मुठमाती देत मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नवी दिल्लीत भेट घेऊन भाजपविरोधी आघाडीत सामील होण्याचे त्यांना आवाहन केले.

राजकीय मजबुरी म्हणा किंवा स्वबळावर महाराष्ट्रात देखील अपेक्षित यश मिळण्याची शाश्वती नसल्याचे बघून म्हणा पवारांनीही राहुल गांधी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत आघाडीची कल्पना मान्य केली. पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, ममता बॅनर्जीची तृणमूल काँग्रेस, मुलायमसिंह यांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, करूणानिधी यांचा द्रमुक अशा अखिल भारतीय म्हणविणा-या पण त्या त्या प्रदेशापुरत्या मर्यादित असणा-या पक्षांनी राहुल गांधी यांच्या आवाहनाला सध्यातरी होकार भरला आहे. (सध्यातरी म्हणण्याचे कारण म्हणजे यातल्या कुठल्या पक्षप्रमुखाचा अहंकार कधी अन् कुठल्या कारणाने उफाळून येईल व त्यांचा पक्ष कधी आघाडीतून बाहेर पडेल याची शाश्वती देता येत नाही) देशात अवघ्या केरळपुरते उरलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भाजप व काँग्रेस अशा दोन्ही राष्ट्रीय पक्षांशी शत्रुत्व असल्याचे जाहीर करून स्वतंत्र लढण्याचे किंवा तिस-या आघाडीचे सुतोवाच केल्यामुळे त्यांचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत समावेश राहणार नाही असे गृहीत धरणे भाग आहे.

लोकसभा निवडणुकीचा समय जसजसा जवळ येत जाईल तशी विरोधकांच्या या आघाडीला निश्चित स्वरूप येईल असे वाटत असतानाच आघाडीतील काही घटकांकडून महत्वाच्या मतदारसंघावर दावा करण्यास सुरूवात झाली आहे. याचे उत्त्तम उदाहरण म्हणजे पुणे मतदारसंघ. पुणे लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असल्याचे एकतर्फीच जाहीर करून शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी काँग्रेसवर नुकतीच कुरघोडी केली आहे.

राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाणा-या पुणे या बहुचर्चित मतदारसंघाच्या आजवरच्या राजकीय इतिहासावर नजर टाकली तरी थेट १९५२ पासून बव्हंशी काँग्रेस पक्षाचाच खासदार येथून निवडून आलेला आहे. अपवाद फक्त १९५७, १९६७,१९७७,१९९१, १९९९ आणि २०१४ सालच्या निवडणुकांचा. विठ्ठलराव गाडगीळ, त्यांचे पिताश्री नरहर विष्णु गाडगीळ, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी व मोहन धारिया यांच्यासारख्या नामवंत बुजुर्गांनी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात शंकरराव मोरे, अण्णा जोशी, विठ्ठल तुपे, प्रदिप रावत व सुरेश कलमाडी यांचीही काही वर्षे वर्णी लागली. गेल्या निवडणुकीतील मोदी लाटेत भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले तर पुणे शहरांतील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजपने राखले. मोदी लाटेचा महिमा आणि देवेन्द्र फडणवीस यांच्या चतुराईमुळे पुण्याच्या महापालिकेवरही भाजपने झेंडा रोवला. पुणे मतदारसंघाची अशी पूर्वपिठिका बघता येत्या काळातील राजकारण कसे वळण घेते हे औत्सुक्याचे ठरणार आहे यात शंका नाही.

राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अलीकडे हल्लाबोल आंदोलनास सुरूवात केली असली तरी अजित पवारांचचे राजकारण काँग्रेसविरोधाभोवतीच फिरते की काय अशी शंका येते. त्यांच्या मतदारसंघावरील दाव्यामुळे तर त्यांचा काँग्रेसविरोध लपून राहिलेला नाही असेच राजकीय कार्यकर्त्यांचे मत बनू लागले आहे.

पण त्याची त्यांना फिकीर नाही. आपल्या मतप्रदर्शनाच्या समर्थनार्थ ते पक्षाच्या ताकदीचे आकडे देतात. जिल्ह्यातील यापूर्वीच्या विधानसभेच्या व महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला मिळालेली मते बघता आपल्या पक्षाची वाढच झालेली दिसून येईल, त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपविरोधी आघाडी अस्तित्वात येऊ देणे, त्यात मतदारसंघनिहाय जागावाटप होणे, काँग्रेसशी बोलणी करणे यांची कुठलिही वाट न पाहता अजित पवारांनी पुणे मतदारसंघ आपलाच असल्याचे जाहीर करून टाकले आहे हे विशेष. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त असल्याच्या त्यांच्या दाव्यामुळे काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे. गेल्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम हे यावेळी पुण्याऐवजी सांगलीतून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविली जाते. त्यामुळे पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा दावेदार कोण याचे औत्सुक्य आहे.

अजित पवारांच्या या आगाऊ दाव्यावर टीका करताना काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाने, मग आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार देऊ असे जाहीर केले. त्याची पवारांनी अर्थातच खिल्ली उडवली. एकंदरीत या प्रश्नावरून दोन्ही काँग्रेसमध्ये शाब्दिक हल्लाबोल सुरू झाला आहे. याचा अर्थ भाजपविरोधी आघाडीला जन्माआधीच तडे जाऊ लागले आहेत.

चंद्रशेखर जोशी