१ रुपयाला झिजवून १५ पैशांवर आणणारा पंजा कोणाचा ? नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका

PM Modi

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरूमध्ये झालेल्या सभेत काँग्रेसवर टीका केली. केंद्राने गावांच्या विकासासाठी १ रूपया पाठवला तर गावाला मिळेपर्यंत त्याचे १५ पैसे व्हायचे. अशा प्रकारेच कोट्यवधींचा निधी मिळाला तरीही प्रत्यक्षात मदत न पोहचवू शकलेला हा पंजा कोणाचा होता? एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणारा पक्ष कोण? असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारले आहे.

याचबरोबर, माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या काश्मीर प्रश्नाबाबतच्या वक्तव्यावरही त्यांनी उत्तर दिले.शनिवारी पी चिदंबरम यांनी ‘काश्मीरला स्वातंत्र्य नको स्वायतत्ता द्या’ असे वक्तव्य केले होते. तेव्हा असे वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना काहीच कसे वाटत नाही? देशातील वीर जवानांनी काश्मीरसाठी आपले प्राण दिले. तरीही भारतात राहणारे आणि देशाचे माजी केंद्रीय मंत्री असलेले नेते असे वक्तव्य कसे करू शकतात? याची किंमत त्यांना मोजावी लागेल असेही मोदी यांनी म्हटले.

काँग्रेसचे नेते आता काश्मीरच्या ‘आझादी’च्या नाऱ्यांमध्ये स्वतःचा स्वरमिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्याच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काँग्रेसला ते पटले नाही. असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला. काँग्रेस पक्षाकडून देशाच्या जनतेला काहीही अपेक्षा नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांनी काश्मीर बद्दल केलेले वक्तव्य हे देशाच्या शहीद जवानांचा अपमान करणारे आहे, अशीही टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

कॅशलेस व्यवहार आणि प्रणालीवर काँग्रेसने सडकून टीका केली. नोटाबंदीविरोधातही वातावरण निर्माण केले. मात्र, कॅशलेस व्यवहार हे भारताचे भविष्य आहे हे विसरू नका. सध्या देशात १२ लाख लोकांनी कॅशलेस व्यवहार करण्याचा संकल्प केला आहे. ही संख्या वाढवणे हा आमचा उद्देश आहे. आमच्यापुढे तुम्ही कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही आम्ही विकासाला गती देणार आहोत, असेही नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरळ सरळ काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. आमचं सरकार दिल्लीतून मिळालेल्या प्रत्येक नफ्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचवते. आम्ही असू किंवा नसू, परंतु देशाला बदनाम होऊ देणार नाही. आम्ही स्वतःसाठी नव्हे, तर जनतेसाठी जगतो, असंही मोदी म्हणाले आहेत. मोदींनी डॉ. हेडगेवार यांच्यावरही स्तुतिसुमनं उधळली आहेत. तसेच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देणा-यांचेही आभार मानले आहेत. उजीरमध्ये ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या सेल्फ हेल्प ग्रुपच्या लाभार्थ्यांना रूपे कार्डही वितरीत केली आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरू आणि बिदार येथे जनसभेला संबोधित करणार आहेत. बिदारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे लाइनचं उद्धाटनही करणार आहेत.