काँग्रेस, जेडीएसच्या आमदारांचा ईगट टन हॉटेलमध्ये मुक्काम

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यामुळे सत्तेचा पेच निर्माण झाला असल्याने आपले आमदार फुटू नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने सर्व आमदारांना कर्नाटकातील प्रसिद्ध ईगल टन हॉटेलमध्ये थांबवले आहे. ईगल टन..बंगळुरूमधलं हे प्रसिद्ध हॉटेल सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचे केंद्र बनले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण कर्नाटकात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळी काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. काँग्रेसचे 6 तर जेडीएसचे 2 आमदार गैरहजर राहिल्याने काँग्रेस आणि जेडीएसच्या गोटात धाकधूक वाढली. मात्र उशिरा का होईना काँग्रेसचे सर्वच्या सर्व म्हणजे 78 आमदार ईगल टन हॉटेलमध्ये थांबले असल्याचे कळते आहे. दरम्यान, नाराज आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजप तसंच काँग्रेस आणि जेडीएसच्या गटाकडून केला जातोय.