कर्नाटकात पुन्हा काँग्रेसच; ओपिनियन पोलचा कौल

नवी दिल्ली : कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया १२ मे रोजी संपन्न होणार असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर सत्ता कोणाची असेल याचा अंदाज एका हिंदी वृत्तवाहिनीने केलेल्या ओपिनिअन पोलद्वारे मांडला आहे. या ओपिनिएन पोलमध्ये कर्नाटकात भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता धूसर असून काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत विराजमान होईल असं सांगण्यात आलं आहे.

आज कर्नाटकात निवडणुका झाल्या तर काँग्रेला २२५ पैकी १०१ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता या ओपिनिअन पोलद्वारे वर्तवण्यात आली आहे. भाजपच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जागा वाढतील मात्र त्या ७८ ते ८६ पर्यंत पोहोचतील हा आकडा सत्तास्थापनेसाठी पुरेसा नाही. जनता दल सेक्युलर आणि त्यांच्याशी आघाडी करणाऱ्यांना मिळून ४३ पर्यंत जागा मिळतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या कर्नाटकात काँग्रेसचं सरकार असून २२५ पैकी त्यांच्याकडे १२२ जागा आहेत. भाजपकडे ४३ तर जनता दल सेक्युलरकडे २९ आमदार आहेत. अन्य पक्षांचे १४ आमदार असून १६ जागा रिक्त आहेत. कर्नाटकात आज निवडणुका झाल्या तर काय होईल याचा अंदाज बांधण्यासाठी इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईटस यांनी संयुक्तपणे एक ओपिनिअन पोल घेतला होता. १७ मार्च ते ५ एप्रिल हा या पोलसाठीचा कालावधी होता आणि २२४ विधानसभा क्षेत्रांमधील मतदारांचे मत घेऊन हा कौल जाणून घेण्यात आला.