काँग्रेसचा गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा!

पणजी : कर्नाटक येथील बदला गोव्यात घेण्यासाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. गेल्या निवडणुकीत १७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. गोवा काँग्रेसचे प्रभारी चेल्ला कुमार थोड्याच वेळात पणजीत दाखल होतील. पक्षाच्या आमदारांसह ते राज्यपालांची भेट घेतील. यावेळी काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना राजभवनात हजर करण्याचीदेखील तयारी दर्शविली आहे.

गोवा विधानसभा ४० सदस्यांची आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ४० पैकी काँग्रेसला सर्वाधिक जागा म्हणजे १७ जागा मिळाल्या होत्या. त्यापाठोपाठ, भाजपला१३ , महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला ३ , गोवा फॉरवर्ड पार्टीला ३ जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षांना ३ तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली होती. काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असताना राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले.

महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने भाजपने सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपदाची मनोहर पर्रीकर यांनी शपथ घेतली. त्यात, विश्वजित राणे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर, काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात दाखल होऊन पुन्हा निवडणूक लढवून भाजपचे आमदार झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना बहुमत सिद्ध करायचं होतं. त्यामुळे गोवा विधानसभेतही पर्रिकर सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला.

भाजप – १३

काँग्रेस – १७ (विश्वजीत राणे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ १७ वरुन १६ वर)

राष्ट्रवादी काँग्रेस -१

महाराष्ट्रवादी गोमंतक – ३

गोवा फॉरवर्ड पार्टी – ३

अपक्ष/इतर -३