संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान आणि अफवाचे पीक व्यवस्थेला धोका विषयावर मंगळवारी पत्रसंवाद कार्यशाळा

नागपूर : विधानमंडळातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे नागपूर पावसाळी अधिवेशन कालावधीत विधान भवन येथे प्रशिक्षण आणि प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार, दि. १७ जुलै रोजी “संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीचे आव्हान” आणि “अफवांचे पीक…व्यवस्थेला धोका” या महत्त्वाच्या विषयांवर पत्रसंवाद कार्यशाळेच्या माध्यमातून विचारमंथन होईल. सहपोलीस आयुक्त, नागपूर तसेच नक्षलवाद विरोधी पथकाचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक शिवाजीराव बोडखे (भा.पो.से.) आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक (सायबर गुन्हे) ब्रिजेश सिंह (भा.पो.से.) हे सादरीकरणासह या समस्यांचा उहापोह करतील.

नक्षलवादी चळवळ ही देशापुढे मोठे आव्हान असून सध्या ही चळवळ अनेक राज्यांमध्ये फोफावत आहे. या नक्षल चळवळीमुळे लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. या चळवळीचे कार्यक्षेत्र पूर्वी फक्त आदिवासी दुर्गम भागापुरते मर्यादित होते. परंतु सध्या शहरातील सुशिक्षित तरुण पिढी देखील या चळवळीकडे आकर्षित होत असल्याच्या घटना पुढे येत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून नक्षलवादी चळवळीचा प्रसार म्हणजे एकप्रकारे संसदीय लोकशाहीपुढे नक्षलवादी चळवळीने उभे केलेले आव्हान आहे. तसेच आजच्या युगात जनमानसात समाजमाध्यमे प्रभावी भूमिका बजावत आहेत. समाजमाध्यमांव्दारे पसरविल्या जाणाऱ्या अनुचित माहितीवर तसेच निर्माण होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवत केलेल्या आततायी कृत्यांमुळे समाजस्वास्थ्य बिघडत आहे.

एकंदरितच अफवांच्या पिकामुळे सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था याला धोका निर्माण होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उपरोक्त दोन विषयांशी निगडीत अनुभवसंपन्न आणि तज्ज्ञ असे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधण्याची, प्रत्यक्ष कार्यक्षेत्राशी संबंधित त्यांचे कृतीप्रवण चिंतन ऐकण्याची संधी प्राप्त होणार आहे. मंगळवार दि. १७ जुलै रोजी दुपारी ४.३० ते ५.४५ यावेळेत मंत्रीपरिषद सभागृह, विधान भवन, नागपूर येथे होणाऱ्या या उपक्रमामध्ये पत्रकार आणि इच्छुकांनी सहभागी व्हावे असे आवाहन वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक निलेश मदाने यांनी केले आहे.
0000