तुषार गांधी म्हणाले, भविष्यात आंबेडकर जयंती होईल की नाही यांची चिंता

पुणे : लोकशाहीची सध्याची व्यवस्था आणि न्यायालये खिळखिळी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याने राष्ट्राचे अस्तित्वच राहील की नाही, की नवी व्यवस्था आपल्याला गुलाम करेल, याची काळजी असल्याचे सांगताना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी म्हणाले, पुढील काळात आंबेडकर जयंती साजरी करता येईल की नाही याची चिंता वाटत असल्याचे ते म्हणाले. अशावेळी सर्व समविचारी पक्षांनी, व्यक्ती आणि संस्थांनी एकत्र येऊन क्रांतीचा लढा देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पुण्यातील क्रांती ज्योती ‘संस्था आयोजित ”वैचारिक भीमजयंती ‘ कार्यक्रमात ते बोलत होते .

यावेळी अन्वर राजन , डॉ सिद्धार्थ धेंडे , वैशाली चांदणे,डॉ. अमोल देवळेकर ,उमेश चव्हाण,विठ्ठल गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते. गांधी म्हणाले, ज्या शक्तींनी बापूंना मारले आणि बाबासाहेबांना बाजूला केले, सध्या त्याच शक्ती आंबेडकरांच्या नावात आतापर्यंत नसलेला राम जोडत आहे. त्यांच्या मनातील डाव ओळखून त्यावर मात केली पाहिजे. बापूंचा राष्ट्रविचार आणि बाबासाहेबांचा संविधान विचाराला याच शक्ती चूड लावू पाहात असल्याचे तुषार गांधी म्हणाले. गांधी विचार आणि आंबेडकर विचार वेगळे असल्याची आवई उठविली जात असल्याचे सांगून ते म्हणाले, दोघांच्या डोळ्यासमोर या राष्ट्राच्या कल्याणाचा आणि सामन्य जनतेचा पुनरुत्थानाचा विचार होता. बापू आणि बाबासाहेबांच्या विचारात वैमनस्य नाही. वैमनस्य असेत तर संविधानाच्या निर्मितीसाठी महात्मा गांधींनी बाबासाहेबांची निवड केली नसती आणि बाबासाहेबांच्या मनात द्वेष असता तर गांधींच्या प्रस्तावाचा स्वीकार केला नसता, असेही ते म्हणाले.