महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह, घोषवाक्य निर्मितीसाठी स्पर्धा

Mantralaya

मुंबई : राज्यातील जनतेला पारदर्शक, कालबद्ध आणि गतिमान सार्वजनिक सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लोकसेवा हक्क अधिनियमाच्या (RTS) बोधचिन्ह रेखाटन आणि घोषवाक्य निर्मिती स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन राज्य शासन आणि राज्य सेवा हक्क आयोगामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ या क्रांतिकारी कायद्यामध्ये आजवर ३९ विभागांच्या ४६२ सेवा अंतर्भूत करण्यात आलेल्या आहेत. सामान्यांना आपले सरकार संकेतस्थळ, मोबाईल अॅप्लिकेशन, ई-महासेवा केंद्र, सेतू केंद्र आणि आपले सरकार केंद्र याद्वारे या सेवांचा लाभ देण्यात येतो. या कायद्याचा प्रचार व प्रसार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून नागरिकांच्या सहभागातून बोधचिन्ह रेखाटन स्पर्धा घेण्यात येत आहे.

बोधचिन्ह आणि घोषवाक्य पाठवण्याची अंतिम मुदत २० मे २०१८ असून विजेत्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. तसेच महाराष्ट्र शासन व राज्य सेवा हक्क आयोगामार्फत पारितोषिक विजेत्या रचनांचा अधिकृत बोधचिन्ह आणि घोषवाक्य म्हणून वापर करण्यात येईल. स्पर्धेच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती  www.maharashtra.mygov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.