राष्ट्रकुल स्पर्धा : नवव्या दिवशी भारताला ३ सुवर्णपदके

गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रलिया येथे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केल्यानंतर आज देखील सुवर्णपदकांची सत्र सुरूच आहे. आज कुस्ती आणि नेमबाजीमध्ये मिळून भारताच्या पदरी ३ सुवर्णपदके आणि २ रौप्यपदके आली आहे.

आज सकाळी कोल्हापूरची कन्या तेजस्विनी सावंतने कालच्या ‘रुपेरी’ यशाचा आनंद द्विगुणित करणारी कामगिरी करत ५० मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. तर, याच स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गल हिनं रौप्य पदकावर नाव कोरले आहे.

त्यांनतर भारतीय नेमबाजांकडून पदकांचा ‘वेध’ सुरूच असून १५ वर्षीय अनिश भानवाला यानं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम सामन्यात अनिशनं ३० गुणांची कमाई करत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा विक्रमही त्याचा नावावर नोंदला गेला आहे. इतकंच नव्हे, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा तो सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.

या दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेतील कुस्तीमध्ये भारतीय मल्ल बजरंग पुनियाने भारताच्या पदक तालिकेत आणखी एका सुवर्ण पदकाची भर घातली आहे. पुरुषांच्या ६५ किलो फ्रिस्टाइल वजनी गटात बजरंगने इंग्लडच्या चार्ली बॉउलिंगला पराभूत केले. कुस्ती प्रकारात भारताचे हे तिसरे सुवर्ण असून आतापर्यंत पुरुष आणि महिला गटात मिळून भारताने आठ पदके मिळवली आहेत. पुरुषांच्या ९७ किलो वजनी गटात मौसम खत्रीला रौप्यवर समाधान मानावे लागले.