लावणीसम्राज्ञी यमुनाबाईंना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई: लोककलेच्या प्रसारासाठी आयुष्यभर निष्ठेने प्रयत्न करणाऱ्या लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या निधनाने एक निस्सीम कलाउपासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे अनन्यसाधारण वैशिष्ट्य असलेल्या लावणीच्या प्रसारासाठी यमुनाबाईंनी आयुष्य वेचले. सर्वसामान्य रसिकांना अस्सल लोककलेची अनुभूती देण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले. लोकनाट्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यात मोठे योगदान असणाऱ्या यमुनाबाईंचे कलावंतांच्या नव्या पिढीला नेहमीच मार्गदर्शन मिळत होते. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवा जोपासणाऱ्या यमुनाबाईंना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कलेच्या विकासाचा ध्यास होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या कलाक्षेत्रातील एक अढळ तारा निखळला आहे.