बलात्कार प्रकरणात ख्रिश्चन धर्मगुरूला अटक, ३ फरार

कोलाम: मलांकारा ऑर्थोडक्स सीरीन चर्च मध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूला अटक करण्यात आले असून, अन्य तीन धर्मगुरू आरोपी फरार झाले आहेत. जॉब मॅथ्यू असे अटक करण्यात आलेल्या धर्मगुरूचे नाव आहे. हा धर्मगुरू मलांकारा ऑर्थोडक्स सीरीन चर्चचा स्थानिक पादरी असून गुरुवारी सकाळी तो गुन्हे शाखेला शरण आला. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. फरार असलेल्या तीन अन्य धर्मगुरूंचा शोध घेण्यात येत आहे. मॅथ्यूकडून त्यांच्याविषयी माहिती काढण्यात येत असून लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अटक करण्यात आल्यानंतर मॅथ्यूला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात येत असतांना त्याने आपला चेहरा झाकला होता. या घटनेतील पीडित महिलेने कन्फेशनगृहात आपल्या पापांची कबुली दिल्यानंतर पाच ख्रिश्चन धर्मगुरूंनी तिचा गैरफायदा घेत, तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. एकाला अटक करून बाकी चार धर्मगुरूंविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाचव्या विरोधात पुरावे नसल्याने त्याला संशयित आरोपी बनविण्यात आले आहे.