डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन

नागपूर : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार १४ एप्रिलला संपूर्ण राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्य आज दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील संविधान चौकात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळयास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

याप्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, संविधानकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांना संविधानाचा अमूल्य ठेवा दिल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. आज आपला देश प्रगतीकडे जात आहे त्याचे कारण आपले ‘संविधान’ आहे. यासाठी प्रत्येक भारतीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन आपले कर्तव्य बजावावे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानावर आधारित राज्याची रचना व वाटचाल सुरु राहील. संविधानरुपी दिलेल्या प्रगती पथावरुन राज्याची प्रगती सुरु राहील, असा संकल्प करुन त्यांनी देशवासियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विभागीय आयुक्त अनूप कुमार, महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज दुबे, रामभाऊ आंबुलकर, सुनिल मित्रा, मुरली नागपुरे, अविनाश धनगये, गोपाल बनकर, चंद्रशेखर डोर्लीकर आदी नगरसेवक, लोकप्रतिनिधी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच नागपुरात बोद्ध बांधवांकडून ठिकठिकाणी रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. यावेळी संविधान चौकात १२७ किलोचा केकही कापण्यात आला.