सावकाराकडील जमिनी परत मिळण्यासाठी कारवाई करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : कर्जदार पिडीत शेतकऱ्यांच्या सावकाराकडील गहाण जमिनी परत मिळण्यासाठी योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषेत दिली.

सावकारी कर्ज व जमिनी गहाण असल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य विद्या चव्हाण यांनी मांडली होती. एका उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले, शेतकरी सावकारमुक्त योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची नावे वगळून खोट्या कागदपत्रांच्या आणि सह्यांच्या आधारे बनावट नावांची यादी तयार करणे गुन्हा आहे. असे आढळून आल्यास उच्चाधिकाऱ्यामार्फत चौकशी करुन कठोर कारवाई करण्यात येईल. पिडीत शेतकरी आणि शासनाची फसवणूक झाल्याचे आढळल्यास याची चौकशी करण्यात येईल, शिवाय पिडीत शेतकऱ्याने सावकाराकडे गहाण ठेवलेले दागिने मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात येतील.

याबाबत झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहभाग घेतला.