नोटबंदीसारख्या निर्णयाचा विरोधात करत मी राजीनामा दिला असता : पी चिदम्बरम

Chidambaram

नवी दिल्ली: नोटाबंदीसाठीच्या निर्णयाची अंमलबजावणी करावयास लावली असती तर आपण अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला असता असे म्हणत माजी अर्थमंत्री पी चिदम्बरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर ताशेरे ओढले.

जर माझ्या पंतप्रधानांनी नोटाबंदी करावी का याबाबत विचारले असते तर मी त्यांना ‘कृपया असे करू नका’ असा सल्ला दिला असता. आणि जर त्याबाबतचा आग्रह केला असता तर मी माझ्या पदाचा राजीनामा दिला असता, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी त्यांनी तडकाफडकी अंमलबजावणी केलेल्या जीएसटी (वस्तू आणि सेवा कर विधेयक) आणि त्यांचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून मोदींवर निशाणा साधला.

पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी अहमदाबाद आणि मुंबई बुलेट ट्रेनच्या प्रकल्पास प्राधान्य असूच शकत नाही. बुलेट ट्रेन करण्यापूर्वी सुरक्षा, स्वच्छता, उत्तम स्टेशन, चांगली सिग्नल यंत्रणा आणि उपनगरीय परिवहन सेवा यामध्ये सुधारणा करण्यासाठी लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नोटाबंदी आणि जीएसटीची अंमलबजावणी यामुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असून, मोदी सरकारच्या या दोन प्रमुख चुका आहेत. नोटाबंदी ही अतिशय वाइट कल्पना होती तर जीएसटी ही चांगली कल्पना होती, मात्र जीएसटी आताच अंमलात आणणे चुकिचे आहे. जीएसटीची अंमलबजावणी करताना आवश्यक ती काळजी आणि लक्ष देणे आवश्यक होते, असे चिदम्बरम यांनी म्हटले आहे.