जनाधार विकत घेण्यासाठी चंद्रकांत पाटील पैशाचा पाऊस पाडतील : गजानन किर्तीकर

सांगली : जनाधार विकत घेण्यासाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे पैशाचा पाऊस पाडत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते व माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी केला आहे. तसेच, देशात मोदींची घसरण सुरू असून खरेदी केलेली माणसे पुन्हा आपल्या वाटेला जातील असा टोलाही त्यांनी लगावला. लवकरच सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. ते आज शहरातील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते

माजी खासदार गजानन किर्तीकर यांनी भाजपसह राज्य व केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, की राज्यात व केंद्रात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचा जनाधार प्रचंड घसरला आहे. भाजपला जनाधार विकत घ्यावा लागतो. ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांना विकतच घेतात. तर, दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रकात पाटील हे पैशाचा पाऊसच पाडतात. भाजपचे हे पैशाचे राजकारण फार काळ टिकणार नाही, अशी घणाघाती टीका यावेळी शिवसेनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार गजानन किर्तीकर यांनी केली.

शिवसेनेचा जनाधार वाढल्याचा त्यांनी दावा केला आहे. ते म्हणाले, की राज्यामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. यामध्ये शिवसेनेला मोठे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांगली, हातकणंगले, कोल्हापूर आणि सातारा या लोकसभा मतदारसंघात शिवसेना स्वतंत्र उमेदवार उभा करणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपला जरी अंगावर घेतले असले तरी ते आता काँग्रेसच्या जवळ गेले आहेत, असे किर्तीकर म्हणाले. शेट्टी हे राहूल गांधी, सोनिया गांधी यांच्या संपर्कात सातत्याने आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात सर्व शक्तीनिशी शिवसेना निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका यावेळी किर्तीकर यांनी स्पष्ट केली आहे.