चंद्रकांत पाटील यांनी शेतक-यांच्या हितासाठी विठूरायाला घातले साकडे

पंढरपूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक विठूरायाची पूजा केली. यावेळी त्यांनी राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे म्हणत विठूरायाला साकडे घातले. कार्तिकी एकादशीनिमित्त भक्तीमय वातावरणात श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज मंगळवारी सकाळी पार पडली. पंढरपूर-कार्तिकी एकादशीचा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशमधूनदेखील लाखो भाविक पंढरपूरमध्‍ये दाखल झाले आहेत.

पदस्पर्श दर्शनाबरोबरच मंदिर समितीने मुखदर्शनाचीदेखील चांगली व्यवस्था केलेली आहे. यात्रा काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सावळ्या विठुनामाच्या जयघोषामुळे पुण्यनगरी असलेली पंढरी भक्तिरसात चिंब झालेली आहे. धर्मशाळा, वाड्यांमधून तसेच चंद्रभागेच्या विस्तीर्ण पसरलेल्या वाळवंटात आणि चंद्रभागेच्या पैलतीरावरील पासष्ट एकर परिसरात भजन, कीर्तन आणि प्रवचनात भाविक दंग झालेले दिसत आहेत.