आरोप खपवून घेणार नाही, कोर्टात खेचेन : चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : माझ्यावर केलेले आरोप खपवून घेणार नाही, कोर्टात खेचेन ; असा दम राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना दिला आहे.

टीका करणाऱ्यांना फटकारतांना ते म्हणाले की, आरोप केल्याने प्रसिद्धी मिळते पण, मी आरोप खपवून घेणार नाही.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण काढण्याला चंद्रकांत पाटील आडकाठी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे व हा विषय सध्या गाजतो आहे, हे उल्लेखनीय.

या संदर्भात बोलतांना पाटील म्हणाले की , गेल्या २० वर्षात ज्यांनी शासकीय जमिनीवरची आरक्षणे हटवली आणि हॉटेल्स, शिक्षणसंस्था आणि मंगलकार्यालये थाटली, त्या सर्व प्रकरणांची यादी मी मागवली आहे. या सर्व प्रकरणांच्या मु ळापर्यंत जाऊन चौकशी करणार आहे. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आरोप करण्याआधी , मी राज्याचा नंबर दोनचा मंत्री आणि पक्षाचा बलाढ्य नेता आहे हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला.

शहरात हॉटेल परिसरातील अतिक्रमणे हटविणे सुरु आहे. याबाबतची कारवाई रोकण्याचा निर्णय नगरविकास खात्याच्या आदेशानुसार आणि अतिक्रमणे नियमित करण्याच्या कायद्यात बसवण्यासाठी मुंबईतील बैठकीत झालेला आहे. त्याता माझा काहीही हस्तक्षेप नाही, असे चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले.

Facebook Comments