दर महिन्याच्या २१ तारखेला योग दिन साजरा करुया – विनोद तावडे

मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून या दिवशी ‘योग दिन’ साजरा केला जातो. महाराष्ट्रातही शाळा महाविद्यालयात यादिवशी ‘योग दिन’ साजरा केला जात असताना, दर महिन्याच्या २१ तारखेला योगासाठी स्वतंत्र वेळ राखून ठेवावा, असे मत शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

आज सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तावडे यांनी राज्यभरातील क्रीडा अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या.

तावडे यांनी यावेळी सांगितले, दरवर्षी २१ जून रोजी योग दिवस साजरा करीत असताना प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला शाळांमध्ये योग दिवस साजरा करावा आणि किमान अर्धा तास विद्यार्थ्यांना योग शिकवावा. महिन्याच्या २१ तारखेला सुट्टी असल्यास त्या तारखेच्या अगोदर किंवा नंतर योग दिवस साजरा करण्यात यावा. योगामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याबरोबरच आजच्या धावपळीत आवश्यक असणारी चपळता, एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे विद्यार्थ्यांना समजून सांगणे आवश्यक आहे.