संभाजी भिडेंना ‘ते’ वक्तव्य करणे पडले महाग !

पुणे : माझ्या शेतातील आंबा खालेल्या जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते,असा अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केले होते. मात्र, भिडे आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण विभागानं त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश नाशिक महापालिकेला दिले आहेत.

संभाजी भिडेंविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाकडे तक्रार केली होती. त्याची कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. भिडे यांच्या वक्तव्याची चौकशी करण्यात यावी. तसेच, त्यांच्या भाषणाची सीडी तपासण्यात यावी. त्यांच्या वक्तव्यात तथ्य आढळल्यास पीसीपीएनडीटी (गर्भलिंग निदान व प्रसवपूर्व कायदा) कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे आदेश त्यांनी महापालिकेला दिले आहेत.

दरम्यान, पीसीपीएनडीटी कायद्यानुसार भिडे यांच्याविरोधात कलम २२ नुसार न्यायालयात खटला दाखल होऊ शकतो. कायद्यानुसार महापालिकेच्या पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला अशा प्रकरणांत खटला दाखल करण्याचे अधिकार आहेत, असं तज्ज्ञांनी सांगितले.