टिटवीचं अंड फोडलं : खापचा बालिकेवर बहिष्कार

- १० दिवसांपासून घराबाहेर एकटीला ठेवले शेडमध्ये

बुंदी : टिटवीचं अंड फोडलं म्हणून पाच वर्षांच्या बालिकेला खाप पंचायतीने घराबाहेर काढले आहे. या पापातून मुक्त होण्यासाठी प्रायश्चित (धार्मिक विधि) करा असे खापने म्हटले आहे.

या प्रकरणाची हकीगत अशी की गावकरी टिटवी पक्षाला शुभ मानतात. त्याच्यामुळे चांगला पाऊस पडतो आणि सर्व अडथळे दूर होतात अशी त्यांची श्रद्धा आहे. एका बालिकेने चुकून टिटवीचे अंडे फोडले. गावकऱ्यांना ही माहिती मिळाल्यानंतर २ जुलैला खाप पंचायतने बालिकेला घरात घेऊ नका, तिला शिऊ नका आणि पापमुक्त होण्यासाठी प्रायश्चित (धार्मिक विधि) करा असा आदेश दिला. यानंतर त्या बालिकेला घराबाहेरच्या एका शेडमध्ये ठेवले. १० दिवसांपासून ती बालिका तिथेच एकटी रहाते आहे. ती पहिल्या वर्गात शिकते.

पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस गावात गेले आणि जिल्हा प्रशासनासोबत मध्यस्थी करत बालिकेला घरात घ्यायला लावले, अशी माहिती हिंदोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सिंह यांनी दिली.

राजस्थान मानवाधिकार आयोगाने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला या घटनेबाबत १९ जुलैपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. ही घटना अत्यंत लाजिरवाणी आणि निंदनीय असल्याचं आयोगाने म्हटलं आहे. मुलीच्या कुटुंबियाने दिलेल्या माहितीनुसार, खाप पंचायतीने पैसे आणि दारुचीही मागणी केली होती. खापचे सदस्य आणि घटनेशी सम्बंधित कुटुंब एकाच जातीचे आहे. पोलिसांनी याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.