काँग्रेस-जेडीएसला काटशह देण्यासाठी भाजपाचा ‘मास्टरस्ट्रोक’

बेंगळुरूः भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी राज्यपालांना भेटून बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे १८ तारखेला शपथ घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेस-जेडीएसला वाट पाहावी लागू शकते. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेस-जेडीएस एकत्र आले असताना, त्यांना काटशह देण्यासाठी भाजपाही सज्ज झाला आहे.

कर्नाटकच्या निकालात कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाला ‘मॅजिक फिगर’नं थोडक्यात हुलकावणी दिली आहे. काँग्रेसचे सात आणि जेडीएसचे चार आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून भाजपाने प्रतिस्पर्ध्यांची चिंता वाढवली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपाला सत्तेचे गणित जमवणे तितकेसे सोपे नसल्याचे लक्षात येताच, काँग्रेसच्या ‘चाणक्यां’नी वेगळे समीकरण मांडले आणि जेडीएसकडे ‘टाळी’ मागितली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष कुमारस्वामींना थेट मुख्यमंत्रिपदाचीच ऑफर दिल्याने त्यांनीही लगेचच ती स्वीकारली.

सगळे निकाल येईपर्यंत वाट पाहा’ म्हणणारे बीएस येडियुरप्पा राज्यपाल वजुभाई वाला यांना भेटायला पोहोचले. आम्ही विधानसभेत बहुमत सिद्ध करू, त्यासाठी आम्हाला आठ दिवसांची मुदत हवी, अशी विनंती त्यांनी राज्यपालांना केली. त्यांच्यापाठोपाठ, कुमारस्वामींनीही राज्यपालांची भेट घेतली.

या घडामोडींनंतर, भाजपाश्रेष्ठीही कामाला लागले आणि ‘ काँग्रेस आणि जेडीएसने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे ११८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. पण, सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला ते आधी संधी देतील, अशीच चिन्हे आहेत.
कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला हे गुजरातमधील ज्येष्ठ भाजपा नेते आहेत. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरात

विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले वजुभाई हे स्वाभाविकच मोदींच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. २००१ मध्ये त्यांनी आपला मतदारसंघ मोदींसाठी सोडला होता. त्यानंतर तब्बल नऊ वर्षं ते गुजरातमधील मोदी सरकारचे अर्थमंत्री होते. त्याआधीही त्यांनी हे खातं समर्थपणे सांभाळले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर, सप्टेंबर २०१४ मध्ये वजुभाईंची नियुक्ती कर्नाटकचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. आता, खऱ्या अर्थाने तेच कर्नाटकमधील ‘किंगमेकर’ ठरताना दिसताहेत.