जातीय, धार्मिक तेढ निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा भाजपाचा घाट – संजय राऊत

मुंबई : जातीय व धार्मिक वाद निर्माण करुन निवडणुका जिंकण्याचा घाट भाजपाकडून घातला जात आहे. देशात अराजक निर्माण करण्याची सुरुवात झाली आहे. आजवर महाराष्ट्र कधी जातीच्या मुद्द्यावर फाटला नव्हता. पण भीमा-कोरेगावच्या प्रकरणामुळे फाटलेला महाराष्ट्र अद्याप शिवला गेलेला नाही. त्यामुळेच जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणाºया शक्तींना चिरडून टाकले पाहिजे, असे आवाहन राऊत यांनी केले. डोंबिवली पत्रकार संघाच्या अनौपचारिक चर्चेदरम्यान ते बोलत होते.

यावेळी त्यांनी मोदी आणि मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासापुरते लक्ष घालू नये. त्यांचा मतदारसंघ म्हणजे देश नाही. पंतप्रधानाच्या वाराणशी मतदारसंघाची स्थिती डोंबिवलीपेक्षा अत्यंत बिकट आहे. म्हणून तेथे मोठ्याप्रमाणात निधी खर्च करून कामे सुरू आहेत, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर लगावला. गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवली हे अत्यंत घाणेरडे शहर असल्याचे वक्तव्य केले होते.

याबाबत राऊत यांनी वस्तुस्थिती मांडत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघावरच निशाणा साधला. गडकरी यांनी जरी डोंबिवलीविषयी विधान केले असले तरी नागपूरची परिस्थिती काय होती? युती सरकारच्या काळात गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाल्यानंतरच नागपूरचा कायापालट होत गेला. आताही मुख्यमंत्र्यांचे जास्त लक्ष नागपूरवर आहे.

सध्याचे मुख्यमंत्री काय किंवा विलासराव देशमुख काय, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात विकासकामे खेचून नेली. त्याला पंतप्रधानही अपवाद नाहीत. ते वाराणसी मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्या मतदारसंघाची अवस्था डोंबिवलीपेक्षा अत्यंत वाईट आहे. त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहेत. पण वाराणशी म्हणजे देश नाही, याकडे राऊत यांनी लक्ष वेधले. राजीव गांधी यांनीही त्यांच्या काळात त्यांचा मतदारसंघ अमेठीवर जास्त लक्ष दिले. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे केवळ त्याचा मतदारसंघ, गाव आणि शहराचे नसतात. ते देशाचे, राज्याचे असतात, अशी मिश्किल टीकाही त्यांनी केली.