भाजपाकडून काँग्रेसच्या आमदारांना धमक्या; गुलाम नबी आझादांचा आरोप

बेंगळुरू : कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय वातावरण अधिकच तापत असल्याचं दिसायला मिळत आहे. बेंगळुरूमध्ये ठाण मांडून बसलेले काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर मोठ्या स्वरूपाचे आरोप केले आहेत. ”सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपानं फोडाफोडीचे भूमिका घेतली आहे. काही आमदारांना मंत्रिपदाची तर काहींना पैशांचे आमिष दाखवले जात आहे. मात्र अशा आमिषांना भीक न घालणाऱ्यांवर भाजपानं आयटी आणि ईडीच्या धाडी घालण्याच्या धमक्या दिल्या आहे”, असा गंभीर आरोपआझाद यांनी केला आहे.

यावेळी आझाद यांनी राज्यपालांवरही टीकास्त्र सोडले आहे. यावेळी आझाद म्हणालेत की, कर्नाटकात विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपाकडे १०४ जागा आहेत, आमच्याकडे (काँग्रेस +जेडीएस) ११७ जागा आहेत. यामुळे राज्यपाल पक्षपातीपणा करू शकत नाहीत. घटनेच्या संरक्षणासाठी असलेले राज्यपाल स्वतःच घटना कशी काय उद्ध्वस्त करू शकतात?,प्रश्न देखील आझाद यांनी केला आहे.