भाजपा आमदार डॉ अनिल बोन्डे यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार

मुंबई : राज्य विधानसभा तसेच विधान परिषदेतील २०१५ ते २०१८ या काळातील उत्कृष्ट संसदपटूंची घोषणा करण्यात आली असून, भाजपचे आमदार डॉ अनिल बोन्डे यांना २०१५-१६ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकूल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणा-या विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील २०१५ ते २०१८ या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, विधानसभा भाजपचे आमदार डॉ अनिल बोडे यांना २०१५-१६ चा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.

अनिल बोन्डे सार्वजनिक उपक्रम समितीचे समिती प्रमुख असून, शेतकऱ्यांच्या विषयासह अनेक विषयावर आ. बोन्डे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणाने विधानसभेत छाप पाडली आहे.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील सभागृह नेते चंद्रकांत पाटील, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, विधानमंडळाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांच्या निवड समितीने या पुरस्कार विजेत्यांची निवड केली.

पुरस्कार विजेत्यामधे अनिल बोन्डे, सुभाष साबणे, राहुल कूल (सर्व उत्कृष्ट संसदपटू विधानसभा), प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे, धैर्यशील पाटील (सर्व उत्कृष्ट भाषण, विधानसभा), अॅड. अनिल परब, विजय गिरकर, संजय दत्त (सर्व उत्कृष्ट संसदपटू, विधान परिषद) अॅड. राहुल नार्वेकर, कपिल पाटील, प्रवीण दरेकर (सर्व उत्कृष्ट भाषण, विधान परिषद). आदींचा समावेश आहे.